वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, संगम माहुलीतील मंदिरांच्या पायऱ्यांना टेकले पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट घोषित केलेला आहे. तर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे. गुरुवारी दुपारी कण्हेर धरणातून प्रति सेकंद 5 हजार क्युसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणातून सुरू असलेला विसर्ग व जोरदार पावसामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सातारा श्रयलागत असलेल्या संगम माहुली येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला असून, या नद्यांची पाणीपातळी वाढल्याने ऐतिहासिक मंदिरांच्या पायऱ्यांना पाणी टेकले आहे. तसेच शाहू महाराज (थोरले) यांची समाधी देखील अर्धी पाण्यात गेली. विसर्ग अथवा पावसाचा जोर वाढल्यास संगमावर असलेल्या कैलास स्मशानभूमीतील अग्निकुंड पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नदीपात्रात पाणी वाढल्याने संगम माहूली तसेच परिसरातील नागरिकांची पाणी पाहण्यासाठी घाटावर मोठी गर्दी होत आहे.

जिल्ह्यात पाठीमागील पाच दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तसेच शुक्रवारीही जिल्ह्याला रेड अलर्ट आहे. यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांना शुक्रवार, दि. २६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.