पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहॆ. त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे.
गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९६ नवजा येथे १३१ तर महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २१४८.०९ फूट झाली असून धरणात ८६.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहॆ
संततधार कायमच असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५२ हजार क्युसेक झाल्यामुळे धरणाची जलपातळी वाढतच आहॆ. धरण परिचालन सुचीप्रमाणे धरणात ८१ टीएमसी पाणीसाठा असणे बंधनकारक असल्याने ३ दिवसांपासून ९ फुटांवर उघडलेल्या धरणाच्या वक्र दरवाज्यात दीड फुटाने वाढ करून ते साडेदहा फुटांवर ठेवण्यात आले आहेत.
कोयना धरणातून नदीपात्रात ५२ हजार१०० क्यूसेस्क पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहॆ. त्यामुळे कोयना नदीने धोका पातळी ओलांडली आहे. हेळवाक येथील पूररेषेत येणाऱ्या राजेंद्र कदम यांच्या घराला पाणी लागल्यामुळे प्रशासनाने त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहॆ. त्याचबरोबर हेळवाक येथील ११ कुटुंबांचे स्थलांतर करण्याची तयारी केली आहे.