कराड प्रतिनिधी । खंडणी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर स्वतःवर काचेच्या वार करून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार कराड शहर पोलीस ठाण्यात केला आहे. या घटनेने पोलीस ठाण्यात धावपळ उडाली तर अखेर पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पवन देवकुळे (रा. बुधवार पेठ, कराड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील मंडईत फळविक्री करणाऱ्या विलासराव जावळे यांना शस्त्राचा धाक दाखवून पवन देवकुळे याने खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस नाईक शशी काळे, कुलदीप कोळी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांच्या पथकाने आरोपी पवन देवकुळे याला ताब्यात घेऊन कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात आणले.
त्यानंतर त्याच्याविरुद्ध फिर्यादी विलासराव जावळे यांची फिर्याद दाखल करण्याचे काम पोलिसांकडून केले जात होते. तसेच या प्रकरणी चौकशीही केली जात असतानाच पोलिसांसमोरच आरोपी पवन याने टेबलवरील काचेवर जोरात डोके आपटले. जोरात डोके आपटल्यानंतर टेबलावरील काच फुटून त्याचे तुकडे इतरत्र विखुरले गेले. यावेळी फुटलेल्या काचेने पवनने स्वतःवर वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या सहाय्यक निरीक्षक गोरड, उपनिरीक्षक डांगे, शशी काळे, कुलदीप कोळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.