मुलीशी झालेल्या वादातून युवकाला विवस्त्र करून चामडी पट्ट्याने जबर मारहाण, खंडाळ्यातील खळबळजनक घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुलीशी वाद झाल्याच्या कारणातून दोन अज्ञातांनी खंडाळ्यातील युवकास नग्न करून चामडी पट्टा आणि निरगुडीच्या काठीने जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच या घटनेचं संशयितांनी चित्रीकरणही केलं आहे. जखमी युवकावर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक मोहन वायदंडे (रा. खंडाळा), असं जखमी युवकांचं नाव असून याप्रकरणी दोन अज्ञातांवर खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

युवकाला जबर मारहाण करणाऱ्या संशयितांच्या कुटुंबातील मुलीशी दीपक मोहन वायदंडे (व्यवसाय-चालक, रा. बेघर वस्ती, खंडाळा) याचा वाद झाला होता. बदली चालक म्हणून जायचे असल्याचे सांगून दोघांनी त्याला दुचाकीवरून खंबाटकी घाटाच्या पायथ्याला असलेल्या कॅनॉलजवळील माळरानात नेले. त्याठिकाणी नग्न करून युवकाला चामडी पट्टा आणि निरगुडीच्या काठीने जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ देखील संशयितांनी केला.

मारहाण करणाऱ्या दोघांनी दीपकला संबंधित मुलीची फोनवरून माफी मागण्यास सांगितली. तसेच जबर मारहाण केली. मारहाणीमुळे दीपक वायदंडे याची पाठ काळीनिळी पडली. त्याला नग्न करून मोबाईलमध्ये चित्रीकरण करत ‘तू पुन्हा खंडाळ्यात दिसायचे नाही’, अशी धमकीही दिली. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या दीपक वायदंडेवर सध्या साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्याच्या फिर्यादीवरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील शेळके पुढील तपास करत आहेत.