पाटण प्रतिनिधी | एखादी व्यक्ती मृत्यू पावली की तिच्या तिसऱ्या, दहाव्याच्या कार्यक्रमास स्मशानभूमीत नैवेद्य ठेवला जातो. यावेळी त्या नैवेद्यास कावळा शिवला की त्या व्यक्तीस मुक्ती मिळाली, तिच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या अशी समजूत मानली जाते. मात्र, सातारा जिल्ह्यात एक असे गाव आहे की त्या गावात कावळे कमी आणि वानरेच जास्त आहेत. कावळ्या ऐवजी वानरेच नैवेद्य शिवतात.
पाटण तालुक्यातील खळे या गावात सद्या या वानरांचाहा प्रताप ग्रामस्थ पाहत आहेत. गावातील स्मशानभूमीत रक्षाविसर्जन विधी वेळी कावळ्या ऐवजी वानरेच नैवेद्यावर डल्ला मारत आहेत. या वानरांना हुसकावताना ग्रामस्थांची तारांबळ उडत आहे. वानरांकडून केल्या जात असलेल्या या प्रतापामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने आवश्यक पावले उचलून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली आहे.
पाटण तालुक्यातील विभागात अन्य गावांच्या तुलनेत खळे, तळमावले परिसरात वानरांचा उपद्रव अधिक आहे. तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाची फळबागही वानरांनी उजाड बनवली आहे. या बागेत आंबा, चिक्कू, फणस आदी फळझाडे मोठ्या प्रमाणात आहेत.
गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर रक्षा विसर्जनाच्या दिवशी स्मशानभूमीचा ताबा वानरांच्या कळपांकडेच असतो. स्मशानभूमीकडे जातानाच अनेकदा डोक्यावरील पाटीतून वरच्यावरच वानरे नैवेद्य पळवितात. विधी सुरू असताना स्मशानभूमीला वानरांचा गराडा पडत असल्याने गावकरी हातात काठी घेऊन त्यांना हुसकविण्यासाठी तेथे थांबलेले असतात. या कारणाने कावळे किंवा अन्य पक्षी तेथे थांबत नाहीत, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.