सातारा प्रतिनिधी । सध्या कडक उन्हाळा सुरु असून उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशात काही महिला आपल्या लेकरांना सोबत कडक उन्हातही कामे करून पोटाची खळगी भरत आहेत.अशाच एका आईचा आपल्या मुलासमवेत काम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एका मोलमजुरी करणाऱ्या आईने आपल्या तीन वर्षांच्या बाळाला दगडाला बांधून ठेवत काम केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दानवली या दुर्गम खेडेगावातील गावातील रोजंदारी करणाऱ्या महिलेने तिच्या चिमुकल्या मुलाची काळजी घेणारे कोणीच नसल्यामुळे शिवाय घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सोबत कामावर नेले. काम करत असताना मुलाकडे लक्ष देणार कोणीच नसल्याने आईने त्याच्या पायाला दगडाला बांधून ठेवलं.
या घटनेचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला तेव्हा याची चर्च होऊ लागली आहे. मोलमजुरी करून आपला संसार सावरणारी आई आपल्या बाळाला अशा प्रकारे बांधण्याची वेळ येते हे व्हिडिओतून पाहिल्यानंतर प्रशासनाकडून काही तरी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
बोलता येत नसल्याने चिमुकल्याच्या व्यथा कोण ऐकणार?
महाबळेश्वर तालुक्यातील ज्या आईने आपल्या चिमुकल्या मुलाला दगडाला बांधून काम केले. त्या मजूर आईच्या 3 वर्षांच्या मुलाला बोलता येत नाही. मुलाला बोलता येत नाही घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळे कसबस मोलमजुरी करून घरचा खर्च भागवायचा. जवळ पैसे नसल्याने मुलावर उपचार देखील करता येत नाही. काम करत असताना आपल्या नजरेपासून लांब आपलं लेकरू जाऊ नये यासाठी आपल्या लेकराच्या पायाला दगड बांधून काम करण्याची वेळ या आईवर आली. पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून ही मजूर महिलेला काम करावे लागत आहे.
सोशल मीडियातून माहिती मिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली जबाबदारी
दरम्यान, परिस्थितीनुसार आलेली गरिबी आणि याच गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलेचे आणि तिच्या लेकराचं भयान वास्तव्य युट्युबवरुन व्हायरल झाले आहे. शितल दानवले यांनी ‘ब्रँड शेतकरी’ या यूट्यूब चैनलवर ही भयान परिस्थिती दाखवत हे आपल्या देशाचं भवितव्य असल्याचे म्हटलं आहे. तसेच, शितल यांनी शासनाकडे या चिमुकल्यास वैद्यकीय मदत मिळावी, अशी मागणी केली. दरम्यान, याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून मुलावरील उपचाराचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे.