सातारा प्रतिनिधी | पावसाळ्यामध्ये पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जातात व पर्यटनाचा आनंद घेतात. पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेत असताना स्वतःच्या जीविताची काळजी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी सातारा येथे धबधब्याच्या ठिकाणी एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी डूडी यांनी सोमवारी फलटण पालखी तळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी निखिल मोरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये २७ मोठे धबधबे व २२ मध्यम आकाराचे धबधबै आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस, वन विभाग, महसूल विभाग यांचे कर्मचारी तैनात असतात. धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना रोखले जाते. तसेच पर्यटकांनी दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पर्यटन करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.