ढेबेवाडी खोऱ्यातील शेतकऱ्यांवर अनोखं संकट; पुरेशा ओलीचा रब्बी पिकांच्या उगवणीवर परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात वेळेत आणि पुरेशा ओलीमध्ये पेरणी झालेल्या बहुतांश क्षेत्रात रब्बी पिकांची उगवण झाली असली तरी खरिपाची पीक काढणी वेळेत न झाल्याने उशिराने पेरणी झालेल्या ठिकाणी मात्र ओलीअभावी उगवणीला फटका बसला आहे. दरम्यान सध्या ज्वारी, पावटा, तूर आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढायला लागला असून, ज्वारीवर लष्करी आळीचा फैलाव दिसत आहे.

ढेबेवाडी शिवारात पावसाने केलेली दमछाक, मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत आणि मजुरांचा तुटवडा यामुळे पेरणीला उशीर झालेल्या ठिकाणी ओलीअभावी उगवण अगदीच तुरळक झाल्याचे दिसून येत आहे. रब्बीत शाळू, हरभरा, गहू आदी पिके शेतकरी प्रामुख्याने घेतात. यंदा सुमारे चार हजार हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये अडीच हजार हेक्टर एकट्या ज्वारीचे (शाळू) क्षेत्र आहे.

पीक स्थिती चांगली असलेल्या शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण असले, तरी तुरळक उगवण झालेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांत काळजीचे वातावरण आहे. या परिसरात खरिपाची पीक काढणी आणि रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, सध्या आंतरमशागतींची कामे सुरू आहेत.