पाटण प्रतिनिधी । चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात फावडे घालून तिचा निर्घृणपणे खून केल्याचाही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पती रमेश शंकर पेंढारे याला पोलिसांनी अटक केली आहे.
कोमल रमेश पेंढारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायटी येथील शंकर पेंढारे हे मुलगा रमेश व सून कोमल यांच्यासह राहतात. रमेशचा विवाह दीड वर्षांपूर्वी मारुल हवेली येथील कोमल हिच्याशी झाला होता. पती रमेश हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शनिवारी रात्री रमेश घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी रमेश याने वडिलांना घराबाहेर ढकलत घराचे दार लावून घेतले. तसेच, घरात असलेले फावडे पत्नी कोमल हिच्या डोक्यात मारून तिचा निर्घृणपणे खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांच्यासह मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन मछले, उपनिरीक्षक रामराम वेताळ, हवालदार सिद्धनाथ शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश पेंढारे याला अटक केली.
रात्री उशिरा ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. उपअधीक्षक सविता गर्जे यांनी घटनास्थळी थांबून अधिक तपासकामी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले तपास करीत आहेत.