पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून 70 फूट खाली दांपत्य कोसळले, एकजण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा महामार्गावरील पारगाव – खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोल्हापूरकडे निघालेले दांपत्य थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) आणि उन्नती उपेंद्र चाटे हे दोघेजण कोल्हापूरला आपल्या दुचाकीवरून निघाले होते. पुणे – सातारा महामार्गावरून जात असताना पारगाव – खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ ते आले असता थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळले.

मात्र, या दांपत्याची गाडी रोडवरच राहिली. जोराचा ब्रेक लागल्याने व चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात घडला असल्याची चर्चा घटनास्थळी केली जात होती.

या अपघातात उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) हे जागीच ठार झाले असून उन्नती उपेंद्र चाटे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तत्काळ सातारा येथे उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले.