सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 6 ते 11 जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करताना पालखीसोबत असणारे अश्व, बैल यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालखी मार्गावर लोणंद पालखी, तळ, तरडगाव पालखी तळ, फलटण पालखी तळ, बरड पालखी तळ येथे हे पथक पशुवैद्यकीय सेवा देणार आहेत. त्यासाठी पशुसंवर्धनचे सहायक आयुक्त डॉ. विश्वंभर पवार सनियंत्रण अधिकारी म्हणून काम करणार आहेत. त्यांच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. हे पथक पालखीमध्ये सर्व प्राण्यांची स्वास्थ्य विषयक तपासणी व उपचार करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक दिवसाला एक पथक अशी चार पथके कार्यरत राहणार आहेत. ही पथके सर्व पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सज्ज राहणार आहेत.
पालखी मार्गावर पशुचिकित्सा पथकाचे मोबाईल व्हॅन वाहन राहणार तैनात
पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी खटाव तालुक्याचे पशुचिकित्सा पथकाचे मोबाईल व्हॅन वाहन पालखी मार्गावर तैनात राहणार आहे. पालखी सोहळ्यात या मोबाईल व्हॅनचा वापर चित्ररथ म्हणून करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती या चित्ररथामार्फत दिली जाणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार : डॉ. दिनकर बोर्डे
पालखी सोहळ्यात सहभागी होणारा वारकरी हा शेतकरी आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवण्याच्या प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली.