विश्रांतीनंतर जिल्ह्यात पाऊस झाला सक्रिय; ढगांच्या गडगडाटासह मुसळधारपणे लावली हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात आज खऱ्या अर्थाने शनिवारी पाऊस पुन्हा सक्रीय झाला. शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात धो-धो पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. तर सातारा शहरात आठवड्यानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला.

आॅगस्ट उजाडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. तर मागील आठवड्यापासून पावसाची विश्रांती होती. कोयना, नवजा, महाबळेश्वर या पावसाच्या भागातही पाऊस पडत नव्हता. पण, शुक्रवारपासून वातावरण बदलले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.

माण तालुक्यातील काही भागात शुक्रवारी दमदार पाऊस झाला. यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तर शनिवारीही माणमधील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. तसेच सातारा शहरातही पावसाची उघडीप होती. शनिवारी आठ दिवसानंतर पाऊस झाला. सायंकाळी पाचनंतर आभाळ भरुन आले. तसेच काळोखी छाया पसरली. त्यानंतर पूर्व बाजुने पावसाचे थेंब पडत येऊ लागले. साडे पाचच्या सुमारास टपोरे थेंब पडू लागले. त्यानंतर पावसाचा जोर वाढतच गेला.

धो-धो पाऊस पडत असल्याने रस्त्यावरील वाहतूकही थांबली. तसेच वाहनेही लाईट लाऊन जात होती. या पावसामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तर सखल भागात पाणी साचले. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले.