पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून मुसळधारपणे कोसळत आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्याला पुन्हा शनिवारी रात्रभर झोडपून काढले. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ५५ तर नवजा येथे ५६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्रावर ४१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार सुरुवात केली असतानाच शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस तालुक्याला रात्रभर धुवाधार पावसाने झोडपले. ढगफुटीसदृश कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील विविध रविवारी पहाटेपर्यंत कोसळत होता.
गेल्या चोवीस तासांत कोसळलेल्या दमदार पावसामुळे शेतात सलग दुसऱ्या दिवशीही पाणी साचल्याने शेतात सर्वत्र पाण्याची तळीच निर्माण झाली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी पाऊस चांगला असला, तरी शेतीला घात येईपर्यंत पेरणीसाठी शेतकऱ्यांना आता वाट पहावी लागणार आहे.