फलटण एसटी आगाराच्या स्थानक प्रमुखाचे तडकाफडकी निलंबन; कारण वाचून बसेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण आगाराच्या वतीने महिलांसाठी अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या अष्टविनायक दर्शनच्या 4 बसचे भाड्याचे पैसे जमा न करता स्वतःकडेच ठेवल्याचे निदर्शनास आल्याने फलटण स्थानक प्रमुख तथा सहायक वाहतूक अधीक्षक राजेंद्र वाडेकर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती फलटण आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांनी दिली आहे.

फलटण आगाराच्या वतीने उत्पन्न वाढीसाठी शेगाव, गणपतीपुळे, आदमापूर व अष्टविनायक दर्शन, अशा विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून दि. ९ सप्टेंबर रोजी महिलांसाठी अष्टविनायक दर्शनचे आयोजन केले होते. फलटण आगाराच्या या उपक्रमास महिलांकडून भरघोस प्रतिसादही लाभला होता. ९ सप्टेंबरला चार एसटी बस महिलांना घेऊन अष्टविनायक दर्शनासाठी रवाना झाल्या होत्या. एका बसमध्ये ४२ महिला, अशा चार बसमध्ये एकूण १६८ प्रवासी महिलांचा समावेश होता.

नारायणगावनजीक परिवहन महामंडळाच्या भरारी पथकाने या बस थांबवून पाहणी व विचारपूस केली असता संबंधित प्रवाशांचे भाडे हे परिवहन महामंडळाकडे जमा केले नसल्याचे लक्षात आले.

या अष्टविनायक दर्शन फेरीचे नियोजन फलटण बस स्थानक प्रमुख राजेंद्र वाडकर यांनी
केल्याने त्यांच्यावर प्रथमदर्शनी संशयाची सुई होती. 4 बसच्या भाड्याचे पैसे परिवहन महामंडळाकडे जमा न करता ते स्वतः:कडे ठेवल्याचे आढळून आल्याने स्थानक प्रमुख राजेंद्र वाडकर यांना निलंबित करण्यात आले.