शिवसेना ठाकरे गटाची 65 जणांची यादी जाहीर; पाटणमधून हर्षद कदमांना मिळाली उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक बैठका पार पडल्यानंतर, तिन्ही पक्षांच्या समन्वयातून अंतिम समीकरण ठरल्याने शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. ठाकरे गटाने पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत विद्यमान आमदारांसह नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदार संघात हर्षद कदम यांना ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे.

आज घोषित केलेल्या उमेदवार यादीत आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून, ठाण्यातून राजन विचारे, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, कुडाळमधून वैभव नाईक, शाहूवाडीमधून सत्यजीत आबा पाटील, बाळापूरमधून नितीन देशमुख, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून तसेच सत्यजीत पाटणकर यांचाही उमेदवारीवर दावा होता. महायुतीने मंगळवारी उमेदवारी जाहीर करून शंभूराज देसाई यांना येथे उतरवले आहे. ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटाने आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत हर्षद कदम या निष्ठावंत शिवसैनिकाच्या निष्ठेचा सन्मान केला आहे.

सत्यजितसिंह पाटणकरांचा पत्ता कट

महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी असलेल्या शरद पवार पक्षाचे नेते जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचा पत्ता कट झाला आहे. पाटणकर गटाने पालकमंत्री देसाई यांच्याविरोधात जोरदार तयारी केली. दरम्यान, पाटणकरांनी देसाई यांच्या विरोधात रान पेटवले असल्याने महाविकास आघाडीतून तिकीट न मिळाल्याने ते माघार घेणार नसल्याचे पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यामधून बोलले जात आहे. ते अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.