कराड प्रतिनिधी | प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाल्याचा विक्रीच्या उद्देशाने साठा करुन ठेवल्याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुटखा, पानमसाल्याचा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सातारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठलराव रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कराड शहरातील पालिका परिसरात प्रतिबंधीत गुटखा व पानमसाला विकला जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर या पंचांसमक्ष शनिवार पेठेत पालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या गणेश ट्रेडींग कंपनीत गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांनी तपासणी केली असता त्यांना प्रतिबंधीत गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला. गणेश ट्रेडींग कंपनीतून त्यांनी १८ हजार ५४३ रुपयांचा साठा हस्तगत केला. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश शिवाजी शिंदे (रा. कल्पतरू कॉलनी, कार्वेनाका, कराड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विजय ज्ञानदेव होगले (रा. कल्पतरु कॉलनी, कार्वेनाका, कराड) याच्यावर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार यांनी शहरातील मार्केट यार्डमधील श्रद्धा ट्रेडींग कंपनीसमोर उभ्या असलेल्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. सुमारे २२ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल तेथून जप्त करण्यात आला. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.