कराड प्रतिनिधी | पुणे आणि नागपूर नंतर आता कराडमध्ये शनिवारी (दि. १०) रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड होणार आहे. कराड उपविभागातील दोनशेहून अधिक गुन्हेगार या परेडमध्ये दिसतील. त्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८० जणांचा समावेश आहे. पोलिसांचा निरोप मिळाल्यापासून गुंडांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांसमोर ओळख परेड असल्याचे एव्हाना गुंडांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे डीवायएसपी कार्यालयात शनिवारी गुंडांची झाडाझडती होणार, हे निश्चित झाले आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील नेत्यांसोबत गुंडांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सराईत गुन्हेगारांना बोलावून त्यांची हजेरी घेण्यात आली. पुण्यानंतर नागपुरातही गुंडांची परेड झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना कायद्याच्या भाषेत दम भरला. गुन्हेगारीला उत्तेजन देणारे रिल्स करणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवला जाईल, असा इशारा देण्यात आला.
पुणे, नागपूरनंतर आता साताऱ्यातील कराडमध्ये शनिवारी गुंडांची ओळख परेड होणार आहे. सराईत गुन्हेगारांना सकाळी १० वाजता डीवायएसपी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. कराड शहर हद्दीतील ८० जणांना निरोप देण्यात आला आहे. उपविभागातील कराड ग्रामीण, उंब्रज, तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार मिळून २०० हून अधिक सराईत गुन्हेगार या परेडला हजर राहण्याची शक्यता आहे.