कराड प्रतिनिधी | राज्यातील काही भागात अद्यापही पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत असून पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार 129 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होऊ लागली आहे.
कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाला 1 जूनपासून सुरूवात झाली आहे. मात्र, महिना उलटला तरी जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाला सुरूवात झालेली नाही. पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचे आगमन उशीराच झाले. परिणामी पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला होता. परंतु, आता पावसाने जोर धरला असून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानावी लागणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार
सातारा जिल्ह्यातील कास, बाणमोलीसह महाळेश्वर, नवजा आणि कोयनानगर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. परिणामी धरणात पाण्याची आवक आता वाढू लागली आहे. प्रतिसेकंद 9 हजार क्युसेक इतकी आवक होऊ लागल्याने धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.
कोयनेतील पाणीसाठा झाला 12.78 टीएमसी
समाधानकारक पाऊस आणि आवक सुरू झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा 12.76 टीएमसी आणि पाणी पातळी 620 मीटर झाली आहे. गेल्या चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 59 मिलीमीटर, नवजा येथे 92 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेस पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग कायम आहे.