कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील नावडी वसाहत येथे वस्तीत असणाऱ्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केली. पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरुच असून शनिवारी पहाटे जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने पशुपालक चिंतेत असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.
नावडी वसाहत येथे शनिवारी पहाटे बिबट्याने संजीवनी सुरेश नलवडे यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून शेळीवर हल्ला केला. यात शेळी ठार झाली. काही दिवसांपासून बिबट्याकडून वारंवार जनावरांवर हल्ला करण्यात येत असून नावडी परिसरात मादी बिबट्या तिच्या पिल्लासह असण्याची चर्चा आहे. नावडी वसाहत गावच्या पश्चिमेला कोयना नदी व ऊस पिकाचे क्षेत्र जास्त आहे. तसेच दाट वनराई देखील आहे. येथील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आर्थिक उत्पन्नासाठी त्याला जोडव्यवसाय, म्हणून पाळीव जनावरे सांभाळली आहेत. त्यामुळे पाळीव जनावरांचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी बिबट्याला पोषक वातावरण असल्याने त्यांचा अधिवास वाढला आहे.
याशिवाय दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असून परिसरात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेळी, कोंबड्या, कुत्र्यावरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. खाद्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्यासह पिल्लाचे दर्शन नागरिकांना वारंवार होत आहे. बिबट्यांच्या अस्तित्वामुळे येथील पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पाळीव जनावरांचा सांभाळ करायचा का नाही? असा यक्षप्रश्न आता त्यांच्यासमोर आहे. वनविभाग अशा घटनांकडे गांभीर्याने पहात नसल्याने स्थानिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वन विभागाने सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
ग्रामस्थ, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण…
बिबट्याने घराजवळ असणाऱ्या गोठ्यात घुसून शेळी ठार केली. संपूर्ण गोठ्यासह घराच्या आसपास बिबट्या भक्ष्य शोधत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मीडियावर फिरत आहे. यामुळे ग्रामस्थ, शेतमजुरी करणाऱ्या महिला, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे.