पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात या ठिकाणी एका जनावरांच्या बंदिस्त शेडमध्ये घुसून बिबट्याने एक शेळी फस्त केली तर एका शेळीला जखमी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरुच असून पंधरा दिवसांतील ही चौथी घटना घडली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुकमध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दोन शेळ्या ठार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला चढविला.येथील शेतकरी श्रीमंत श्रीपती कांबळे यांच्या बंदिस्त असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये घसून बिबट्याने एक शेळी फस्त केली, तर दुसरी शेळी जखमी झाली आहे.
दिवशी गावच्या सभोवती डोंगर क्षेत्र असून दाट वनराई देखील आहे. येथील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आर्थिक उत्पन्नासाठी एक जोड व्यवसाय म्हणून येथील शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात. त्यामुळे पाळीव जनावरांचे चरा प्रमाण देखील जास्त आहे. या ठिकाणी बिबट्याला पोषक वातावरण असल्याने त्याचा अधिवास वाढला आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असून परिसरात वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेळी, कोंबड्या, कुत्र्यावरील हल्ल्त्याच्या घटना वाढल्या आहे. अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याचे दर्शन नागरिकांना वारंवार होत आहे. बिबट्यांच्या अस्तित्वामुळे येथील पशुधन धोक्यात आले आहे.