सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सायंकाळी चार वाजता पाणी सोडण्यात येणार असलयामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत पूर परिस्थितीची माहिती घेतली तसेच प्रशासनास अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या.
पालकमंत्री देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात अतिवृष्टीबाबत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अरुण नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासह प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी दृरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जिल्ह्यात आत्तापर्यंत 143 टक्के पाऊस झाला असून एकूण सरासरीच्या 66.8 टक्के हा पाऊस आहे. सद्यस्थितीत सर्व प्रमुख धरणे 70 टक्के भरली आहेत. कोयना धरणातून 11 हजार क्युसेक्स तर कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला पुढील दोन दिवस रेड अलर्ट व त्यानंतर चार दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, अशी माहिती बैठकीत दिली.
दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा हा वाढू लागला आहे. आज गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. दरवाजातून १० हजार आणि आणि पायथा वीजगृहातून १०५०, असा एकूण ११ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी आज आढावा बैठक घेत प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.