पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील गारवडे येथील आकुरीच्या शिवारात ओड्याकडे पाणी पिण्यासाठी जात असताना तोंडावर पडून गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाटण तालुक्यातील बहुले वनपरक्षेत्राच्या डोंगराला गेल्या आठवड्यापासून लागलेल्या आगीमुळे डोंगरातील वन्यजीव प्राणी डोंगरातून खाली शेती शिवारात जीव वाचवण्यासाठी, अन्न पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी गारवडे येथील आकोरीच्या शिवारात ओढ्यात एक गवा रेडा मरून पडल्याची घटना घडली.
गवारेड्याच्या ओढ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मालकी क्षेत्र येथील एका ओढ्यात स्थानिक शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ वनखात्यात माहिती दिली. वन खात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, मल्हारपेठ विभागाचे वनपाल सर्जेराव ठोंबरे, पाचगणी येथून वनपाल विशाल हरपळ, वनरक्षक मेघराज नवले, रवी कदम दुपारी दीड वाजेपर्यंत घटनास्थळावर पोहोचले. यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता एक गवारेडा ओढ्याच्या कडेला जात असताना दहा ते अकरा फूट उंचीवरून खाली ओढ्यातील गाळात तोंडावर खोचला पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व वन मजूर यांच्या साह्याने, जेसीचीच्या मदतीने या गवा रेड्याला बाहेर काढून पंचनामा केला. मल्हारपेठ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचित्रा माळी शवविच्छेदन करून अहवाल तयार केला. जेसीबीच्या मदतीने, उपस्थित ग्रामस्थ, वनमजूर यांच्या मदतीने उपस्थित ग्रामस्थ वन मजूर यांच्या मदतीने बाहेर काढून मृत गवा रेड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.