सातारा प्रतिनिधी | खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षे फरारी असलेल्या मुख्य संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले आहे. बिहारमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेवालाल चौहान, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२१ मध्ये मजूर राजू चंद्रबली पटेल (वय ३२, रा. चंद्रबली, सिरजमदेई, देवारिया, उत्तरप्रदेश) याचा कंत्राटदार मेवालाल चौहान व इतर साथीदारांनी पैशाच्या वादातून निर्घृणपणे खून करून मृतदेह येरळा नदीपात्रात पुरला होता. याप्रकरणातील मुख्य संशयित मेवालाल चौहान व अन्य संशयित आरोपी फरार झाले होते. त्यातील ३ संशयितांना पकडण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले. मात्र , मुख्य संशयित सापडत नव्हता. परराज्यात त्याचा शोध घेवूनही आरोपीला पकडण्यात यश येत नव्हते.
मागील दोन वर्षापासून तांत्रिक पद्धतीने सुरू ठेवलेल्या तपासाला अखेर यश आले. मुख्य आरोपी मेवालाल जवाहर चौहान (रा. बिहार) हा शिवान जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले. त्याठिकाणी सापळा रचून आरोपीला शिताफीने पकडले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे आणि आशिष कांबळे करीत आहेत.
संदीप शितोळे, आशिष कांबळे या अधिकाऱ्यांसह पोलीस हवालदार शैलेश फडतरे, पोलीस नाईक सुनिल अब्दागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी ही कारवाई केली.