सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी ‘मिशन तेजस्विनी’ अंतर्गत कर्करोग निदान व उपचार क्षेत्रात मोठी प्रगती साधण्यात आली आहे. महिला दिनानिमित्त सुरू झालेल्या महिला आरोग्य शिबिरांद्वारे जिल्ह्यात 70 हजार हून अधिक महिलांचे गावस्तरावर मोफत आरोग्य परीक्षण करण्यात आले.
या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून, दि. २५ नोव्हेंबर पासून ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्य विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि पाथ संस्था यांच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणाद्वारे वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञांना, तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी आणि निदानासाठी सुसज्ज करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी या उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना म्हणाल्या की, जिल्ह्यातील कोणत्याही महिलेला कर्करोगाच्या निदानासाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागू नये, ही आमची प्राथमिकता आहे. मिशन तेजस्विनी अंतर्गत आम्ही ६ लाख महिलांचे कर्करोगासाठी स्क्रीनिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून त्यांना घराजवळच उपचार मिळतील. तालुका स्तरावर निदानासाठी हब्जची स्थापना करण्याचे नियोजन आहे. जिल्हा रुग्णालयात बहुतेक शस्त्रक्रिया केल्या जातील.
याशिवाय, पुढील दोन-तीन महिन्यांत एक डे-केअर केमोथेरपी सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. मिशन तेजस्विनी हा उपक्रम म्हणजे सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून समाजासाठी मजबूत आणि सुलभ कर्करोग आरोग्यसेवा निर्माण करण्याचे प्रतीक आहे. या मोहिमेंतर्गत विशेषतः महिलांसाठी लवकर निदान आणि वेळेवर उपचार जिल्हास्तरावर उपलब्ध व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे नागराजन यांनी म्हटले.