कराड प्रतिनिधी । सध्या अनेक फायनान्स कंपनीकडून लोकांना सोने तारण कर्ज दिले जात आहेत. त्या बदल्यात त्यांच्याकडून व्याज तसेच खर्चाची मासिक हप्प्त्यापोटी ठराविक रक्कम देखील घेतली जात आहे. मात्र, असे करत काही फायनान्स कंपनीकडून फसवणूक देखील होण्याची शक्यता असते. अशीच घटना कराड शहरात घडली आहे. फायनान्स कंपनीत बनावट सोन्यावर कर्ज उचलून तसेच कर्जदारांनी कंपनीत ठेवलेले सोन्याचे दागिने गहाळ करून तब्बल ३९ लाख ३३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी चारजणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन युवराज शिंदे (रा. सिटी पोलिस लाईन, सातारा) याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅग फिनसर्व कंपनीची कराड मध्ये एक शाखा आहे. या शाखेद्वारे गरजूंना सोने तारण कर्ज दिले जाते. संबंधित शाखेमध्ये सचिन शिंदे हा प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करतो. कंपनीच्या नियमानुसार दर चार ते सहा महिन्यांनी कंपनीचे अंतर्गत ऑडिट केले जाते. त्यानुसार खलिफ शेख यांनी ३ जुलै २०२३ रोजी कराड येथील असलेल्या आपल्या शाखेचे ऑडिट केले. ज्यावेळी त्यांनी शाखेच्या व्यवहाराचे ऑडिट केले त्यावेळी त्यांना आपल्या शाखेत अपहार झाल्याचे आढळून आले.
शाखेत अपहार झाल्याचे आढळल्यानंतर सचिन शिंदे याने अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून विविध कर्ज खात्यांमध्ये खोटे सोने ठेवल्याचे तसेच काही दागिन्यांचे जास्त मूल्यांकन दाखवून कर्ज वाटप केल्याचे ऑडिटर खलिफ शेख यांना आढळून आले. ही गोष्ट खलिफ शेख यांनी कंपनीच्या निदर्शनास आणून दिली. शाखेतील सर्व व्यवहार तपासण्यात आले असता काही कर्जदारांनी कंपनीत तारण ठेवलेले सोने गहाळ झाल्याचेही निदर्शनास आले.
त्यामुळे कंपनीच्या कराड शाखेचा मॅनेजर सचिन शिंदे याच्यासह सोनार व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मिळून कंपनीत ३९ लाख ३३ हजार १३९ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, मॅग फिन सर्व कंपनीचे एरिया मॅनेजर नासिर अली नौशाद अली बागवान यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.