सातारा प्रतिनिधी । सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीने थायलंड ट्रिपचे तिकीट देतो, असे सांगून साताऱ्यातील चार तरुणांना तब्बल ३ लाख २५ हजारांचा गंडा घातलयाची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूपिंदर सिंग (रा. बलदेवनगर, अंबाला सिटी, हरयाणा), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील ३३ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावरील एका साईटवरून मोबाइल खरेदी केला. त्यावेळी भूपिंदर सिंग या नावाच्या व्यक्तीशी त्या तरुणाशी ओळख झाली. या ओळखीतून त्या तरुणाचे भूपिंदर याच्याशी बोलणे वाढले. थायलंड येथे ट्रिपला जाण्यासाठी तुम्हाला तिकीट देतो, असा विश्वास सिंगने त्या तरुणाला दिल्यानंतर आम्ही चार मित्र असून, या चाैघांचे मिळून पैसे पाठवतो, असे साताऱ्यातील त्या तरुणाने सांगितले.
भूपिंदरवर विश्वास ठेवून साताऱ्यातील तरुणाने भूपिंदरच्या कोटक महिंद्रा बॅंकेत असलेल्या अकाउंटवर अधूनमधून ३ लाख २५ हजार रुपये जमा केले. 0काही दिवसांनंतर ईमेल आयडीवर सिंग याने थायलंडचे तिकीट पाठवले. ठरल्याप्रमाणे चार मित्र थायलंडला जाण्यासाठी साताऱ्यातून मुंबईला रवाना झाले. मुंबईतील विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना आपल्याला जे तिकीट देण्यात आले आहे त्याचे बुकिंग केले नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सिंग याला फोन करून विचरण केली असता सिंग याने थोडा घोटाळा झाला असून, दोन दिवस थांबा तुम्हाला दुसरे तिकीट पाठवतो, असे सांगितले.
सिंगचे ऐकून हे चार मित्र मुंबईत दोन दिवस थांबले. मात्र, सिंगसोबत त्यांचा पुन्हा संपर्क झालाच नाही. उलट त्याने साताऱ्यातील या चौघा मित्रांचे नंबर ब्लॉकलिस्टला टाकले. तेव्हा या चौघांना कळायचे बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर चौघेजन नाराज झाले आणि पुन्हा साताऱ्यात परतले. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार राहुल गायकवाड करत आहेत.