सातारा प्रतिनिधी | सातारा पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने खंडाळा तालुक्यात नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत पुण्यातील सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे चार पिस्तूल व चार जिवंत काडतूसे असा २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित गुन्हेगार पिस्तूल विक्रीसाठी आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय २४, रा. महर्षीनगर, स्वारगेट, पुणे) याला अटक करीत शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर घटनास्थळावरुन दिग्विजय ऊर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस, पुणे) याने पोबारा केला. पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली.
सराईत गुन्हेगार शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे व त्याचा साथीदार दिग्विजय ऊर्फ सनी देसाई हे शिंदेवाडी (ता. खंडाळा)गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या कंपाउंडजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान, दोन व्यक्ती दुचाकीवरून येताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी शिताफीने खाली ओढत ताब्यात घेतले. माञ, दुचाकीचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.
ताब्यात घेतलेल्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीची ४ पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे मिळून २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अंमलदार लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, शिवाजी भिसे, सचिन ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरुण पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद हे अधिक तपास करीत आहे.