सातारा प्रतिनिधी | वाखरी- शिरढोण बायपास मार्गावर शिरढोणमध्ये कालव्यात भरधाव चारचाकी मोटार पलटी होऊन पवारवाडी (ता. फलटण) येथील चार जण जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते.
एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कान्हेरकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व चालक सुदाम तानाजी नलवडे (सर्व रा. पवारवाडी, ता. फलटण) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास निंबाळकर कुटुंबीय चारचाकी मोटारीने (एमएच ४८ एडब्लू ५५४३) तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते.
पुणे ते मोहोळ मार्गावरील वाखरी- शिरढोण बायपास मार्गावर शिरढोण हद्दीत चालक सुदाम तानाजी नलवडे यांचा भरधाव मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार कालव्यात उलटली. त्यात एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कान्हेरकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व चालक सुदाम तानाजी नलवडे हे चौघे जागीच ठार झाले.
या अपघातात रुक्मिणी अंकुश गवळी, वर्षा एकनाथ निंबाळकर, मंगल नामदेव निंबाळकर, अमृता एकनाथ निंबाळकर, समृद्धी एकनाथ निंबाळकर, आदिती एकनाथ निंबाळकर आणि अशुतोष सचिन निकम जखमी झाले. मृत चालक सुदाम तानाजी नलवडे यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. रुक्मिणी अंकुश गवळी (वय ५३, हडपसर) यांनी फिर्याद दिली.