भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत; अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढत दिले जीवदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | भक्षाचा पाठलाग करत असताना सुमारे ३५ फुट खोल विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचारी व प्राणीमित्रांनी‌ सुखरूप बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना महाबळेश्र्वर तालुक्यातील भिलार येथे आज घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्र्वर तालुक्यातील भिलार येथे शिवारात आज एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्यासह जेनीस स्मिथ एनिमल वेलफेअर ट्रस्ट, पाचगणी व स्थानिक प्राणी मित्र यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच विहिरीत पडलेल्या बिबट्याला लाकडी शिडी व दोरी च्या सहाय्याने एक ते दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर सुस्थितीत बाहेर काढले. त्यानंतर नजीकच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

सदर वन्यप्राणी बिबट्याला विहीरीतून बाहेर काढणेसाठी स्थानिक रेस्क्यू टीम तसेच प्राणीमित्र व पर्यावरणप्रेमी आणि भिलार ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वन्यप्राणी बिबट नजीकच्या डोंगर क्षेत्रात सुस्थितीत निघून गेला. वनाधिकारी यांनी सर्व ग्रामस्थांना वन्यप्राणी बिबट बाबत जनजागृती करून सावधान राहणेचे आवाहन केले. उपवनसंरक्षक श्रीमती. आदिती भार‌द्वाज, सहाय्यक वनसंरक्षक सातारा श्री. प्रदीप रौंधळ, मा. वनक्षेत्रपाल महाबळेश्वर श्री. गणेश महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम कार्यवाही मा. वनपरिमंडळ अधिकारी गुरेघर श्री. आर.व्ही. काकडे व वनरक्षक गुरेघर श्री. वैभव अशोक शिंदे, वनसेवक श्री. संजय भिलारे, कर्मचारी श्री. साहेबराव पार्टे व श्री. अनिकेत सपकाळ तसेच स्थानिक रेस्क्यू टीम, निसर्गमित्र यांनी पार पाडली.