जखिणवाडीत 2 तासांच्या रेस्क्यू मोहिमेतून विहीरीत पडलेल्या 2 बिबट्याच्या बछड्यांची सुखरूप सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्याना वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर एका मागून एक अशा 2 बिबट्याच्या बछड्यांना पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जखिणवाडीच्या धनगरवाडा शिवारात सुखदेव येडगे यांच्या शेतात एक विहीर आहे. शनिवारी ते नेहमी प्रमाणे विहिरीच्या परिसरात गेले. ते शेतात काम करत असताना त्यांना विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीलगत जाऊन पाहिले असता त्यांना दोन बिबट्याची बछडी दिसून आली. त्यांनी याबाबतची माहिती गावातील ग्रामस्थांना दिली. माहितीनंतर ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सुखदेव येडगे यांच्या शेतीत सिमेंट काँक्रीटने बांधलेली विहिरी लगत ग्रामस्थ गोळा झाले. काही वेळेनंतर वनअधिकारी तुषार नवले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या दोन्ही बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यासाठी वनविभागाने सकाळी दहा वाजता रेस्क्यू ऑपरेशनला सुरु केले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश मिळाले. तसेच त्यानंतर दुसऱ्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढले.