बिबट्याची 4 पिल्ले अखेर विसावली आईच्या कुशीत; चचेगावात वन विभागाने घडवली पुनर्भेट

0
602
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव

कराड तालुक्यात सध्या ऊसतोड सुरू असून ऊसतोडी दरम्यान बिबट्याची पिल्ले फडात आढळून येत आहेत. अशा पिल्लांची त्यांच्या आईशी पुनर्भेट घडवण्यात वन विभागाला यश येत आहे. अशीच घटना बुधवारी सायंकाळी कराड तालुक्यातील चचेगाव येथील शेतात घडली. ऊसतोडणी सुरू असताना चचेगाव येथील शेतात आढळून आलेली बिबट्याची चार पिल्लांची बिबट्या मादीसोबत भेट घडवून आणण्यात वन विभाग व कराड वाईल्ड हार्ट रेस्कूअर नाईट टीमला यश आले आहे. या पिल्लांमध्ये तीन नर, तर एका मादीचा समावेश आहे. महिना- सव्वा महिन्याची ही पिल्ले होती.

याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील चचेगाव येथील बाराबाईची विहीर नावाच्या शिवारात ऊसतोडणी सुरू होती. ऊसतोड मजुरांना ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार यांच्या शेतात उसाच्या सरीत ४ पिल्ले आढळून आली. पिल्ले आढळून येताच मजुरांनी ऊसतोड थांबवून त्याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पिल्लांना एका बकेटमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवून वनविभागाला माहिती दिली.

माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी देखील काही तासांत घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याला पकडण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी भूमिका घेतली. वनखात्याच्या बदलत्या नियमामुळे बिबट्याला पकडण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागत असल्याची माहिती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

तसेच पिल्लांना ताब्यात घेत बिबट्या मादी व पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वन विभाग व वाईल्ड हार्ट रेस्कूअर नाईट टीम त्यासाठी परिश्रम घेतले. सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी मादी येऊन पहिले पिल्लू, सात वाजून ३६ मिनिटांनी दुसरे, ७.४० मिनिटांनी तिसरे, तर ७ वाजून ४८ मिनिटांनी चौथे पिल्लू घेऊन गेली. वन विभागाच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले आहे.

या मादी व पिल्लांच्या पुनर्भेटीसाठी साताऱ्याच्या उपसरंक्षक अदिती भारद्वाज, सहायक वनसरंक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मलकापूरचे वनपाल आनंद जगताप, कोळेचे वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक कैलास सानप, वनरक्षक अक्षय पाटील, योगेश बडेकर, भरत पवार यासह रेस्कुअर टीमचे अजय महाडिक, रोहित कुलकर्णी, गणेश काळे, सचिन मोहिते, रोहित पवार व विशाल साठे घटनास्थळावर थांबून होते. दोन ट्रॅप कॅमेरे अणि तीन लाईव्ह कॅमेरे घटनास्थळावर लावले होते. अखेर पिल्लांची आईसोबत पुनर्भेट झाली.