जमिनीच्या वादातून काळजमधील खून; हडपसर, नवी सांगवीतील पाच संशयितांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | काळज (ता. फलटण) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या नितीन तकदीर मोहिते (वय ४०, रा. काळज) यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा दीपक मोहिते (रा. नवी सांगवी), यश बबन सोनवणे (वय १८, रा. हडपसर) विशाल अशोक फडके (वय २०, नवी सांगवी) ओंकार किशोर खंडाळे (वय १९), ऋषिकेश तीर्थराज सकट (वय १९, दोघे रा. पिंपळे गुरव पुणे) व एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की काळज येथील नितीन मोहिते व विमल महादेव मोहिते ही दोन कुटुंबे शेजारी राहात होते. दोन्ही कुटुंबांमध्ये घराच्या जागेवरून फेब्रुवारी महिन्यामध्ये वाद झाला होता. यावेळी झालेल्या धक्काबुकीमध्ये विमल मोहिते जखमी झाल्या. त्याचा राग मनात धरून संशयित दीपक महादेव मोहिते (वय ४७), ज्योती दीपक मोहिते (वय ४४), मुलगा कृष्णा मोहिते (वय २२, तिघे रा. शिवाजीपार्क समर्थनगर, नवी सांगवी, पुणे) यांनी खुनाचा कट रचला.

संशयित कृष्णा व त्याच्या साथीदारांनी नितीन मोहितेवर काही दिवस पाळत ठेवली. १४ ऑक्टोबरला सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नितीन मोहिते काळजमधील लक्ष्मी देवी मंदिराच्या मंडपामध्ये बसला होता. त्या वेळी संशयितांनी कोयता, चाकूने वार करून खून केला होता. याप्रकरणी रितेश राजेश मोहिते (वय २१ रा. काळज) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपअधीक्षक राहुल धस व बाळासाहेब बालचीम यांनी घटनास्थळी भेट देऊन सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांना सूचना दिल्या. पोलिसांच्या विविध पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, सुशील भोसले, उपनिरीक्षक शिवाजी काटे, विशाल कदम, दिलीप येळे, विष्णू धुमाळ, देवेंद्र पाडवी, विजय पिसाळ, नितीन भोसले, संजय बनकर, सर्जेराव सूळ, संतोष नाळे, रत्नसिंह सोनवलकर, अतुल कुंभार, योगेश कुंभार, धनाजी भिसे, महेश टेकवडे, प्रवीण मोरे, राहुल मोरे, शुभांगी धायगुडे, सिद्धेश्वर वाघमोडे, विठ्ठल काळे, केतन लाळगे, सुनील नामदास, अंकुश कोळेकर, गोविंद आंधळे, अभिजित घनवट, अमोल जाधव, संजय चव्हाण, जयवंत यादव, स्नेहल कापसे, ऋतुजा शिंदे, भारती मदने, अक्षदा अहिवळे, प्रियंका नरुटे, रोहित फर्णे, परितोष दतीर, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, अमित झेंडे, स्वप्नील कुंभार, लक्ष्मण जगधाने, अरुण पाटील, अजित कर्णे, राकेश खांडेके, ओंकार यादव, रोहित निकम, शिवाजी गुरव, रवी वर्णेकर, सायबर शाखेतील श्रद्धा

माने, प्रशांत मोरे, ओंकार डुबल, जय गायकवाड, नितीन शिंदे, सचिन जगताप, अमोल कर्णे, विशाल वायकर, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, हणमंत दडस व अविनाश नलवडे आदींनी तपासकामी सहकार्य केले.