सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शिंदेवाडी हद्दीत बँकेच्या ताब्यात असणाऱ्या आशबी इंडस्ट्रीज इंडिया या बंद कंपनीला आग लागून त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रीवारी घडली. दरम्यान, संबंधित कंपनीला आग लागली की, लावण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेचा पोलिसांकडून आथिर्क तपास केला जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील शिंदेवाडी हद्दीत आशबी इंडस्ट्रीज इंडिया ही कंपनी आहे. थकित कर्जप्रकरणामुळे एका राष्ट्रीयकृत बँकेने सदरील कंपनीची मिळकत प्रशासकीय व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत ताब्यात घेत याठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान, बंद कंपनीच्या परिसरातून अचानकपणे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच याची माहिती शिरवळ पोलिस स्टेशनला मिळताच शिरवळचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे हे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच शिरवळ रेस्क्यू टीम यांच्या समवेत घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी लॉकिम ग्रुप, शिंदेवाडी, वाई नगरपरिषद, भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब व खासगी टँकरच्या साह्याने तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात शिरवळ पोलिस व शिरवळ रेस्क्यू टीमला व स्थानिक नागरिकांना यश आले. घटनेची नोंद शिरवळ पोलिस स्टेशनला उशिरापर्यंत झाली नव्हती. शिंदेवाडी येथे बँकेच्या ताब्यात असणाऱ्या कंपनीला जुन्या मालकांकडून व बँकेकडून हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असताना कंपनीला अचानकपणे आग लागल्याने व आग विझविण्याकरिता आलेल्या अग्निशमन बंबाला सुरक्षारक्षकांनी आग विझवण्यासाठी प्रतिबंध केल्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.