सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील पळशी याठिकाणी भंगाराच्या गोदामाला मंगळवारी लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आकाशामध्ये निर्माण झाले होते. दरम्यान, अग्निशमन बंबांच्या व खासगी टँकरच्या साहाय्याने चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात शिरवळ पोलिस व शिरवळ रेस्क्यू हीमला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पळशी हद्दीतील लॉकिम फाटा ते पळशी रोडवरील मोहनभाई भानुशाली यांच्या मालकीचे भंगाराचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. दरम्यान, सोमवार, दि. १८ रोजी दुपारी दोनच्या सुमारास अचानकपणे या ठिकाणी असणाऱ्या प्लास्टिक, पुठ्ठा या साहित्यातून मोठ्या प्रमाणात धूर येत आग लागल्याचे त्याठिकाणी उपस्थित कामगारांच्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण करीत मोठ्या धुराचे लोट आकाशात दिसू लागले.
आग लागल्याचे शिरवळ पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे हे पोलिस कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीम सदस्यांसहीत व मंडलाधिकारी संतोष नाबर, मंडलाधिकारी तुषार भांगे, तलाठी स्मिता शिर्के दाखल झाले, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, वाई नायब तहसीलदार वैभव पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख देविदास ताम्हाणे यांच्याशी संपर्क साधत तातडीने घटनास्थळी गोदरेज ग्रुपचे अग्निशमन बंब, भोर नगरपरिषद, वाई नगरपरिषद, पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (नांदेड सिटी), एशियन पेंट्स कंपनीचे अग्निशमन बंब व खासगी टँकर दाखल झाले.
अग्निशमन बंब व पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात शिरवळ पोलिस व शिरवळ रेस्क्यू टीम सदस्यांना यश आले. तत्पूर्वी या घटनेमध्ये मात्र गोदामातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आकाशात धुराचे लोट उडालेले पाहायल मिळत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबर निर्माण झाली होती.