कराड प्रतिनिधी | घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसलेल्या चोरट्यांनी कुऱ्हाड आणि कोयत्याचा धाक दाखवून एका कुटुंबाकडील दीड लाख रुपयांचे दागिने तसेच रोकड लुटल्याची घटना कराड तालुक्यातील वाघेरीयेथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञातांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलावर छबुलाल शेख यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील वाघेरी येथे दिलावर शेख हे कुटुंबासह राहण्यास आहेत. दि. २९ जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शेख कुटुंबीय जेवण आटोपल्यानंतर झोपण्याची तयारी करीत होते. त्याचवेळी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घराच्या उघड्या दरवाजातून दोन अज्ञात घरामध्ये घुसले. त्या दोघांनीही तोंडाला काळे मास्क लावले होते.
एकाच्या हातात कुऱ्हाड तर दुसऱ्याच्या हातात लोखंडी कोयता होता. त्यांनी शेख कुटुंबीयांना कुऱ्हाड आणि कोयत्याचा धाक दाखविला. दिलावर शेख यांच्या पत्नी उमदा व सून तबस्सूम यांना धाक दाखवून त्यांनी त्यांच्याकडील दागिने काढून घेतले. तसेच दिलावर यांना त्यांच्या घरातील लोखंडी कपाट उघडण्यास सांगून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोकड काढून घेतली. त्यानंतर दोन्ही चोरटे घरातून बाहेर पडले. घराबाहेर उभे असलेल्या दुचाकीवरून ते निघून गेले. याबाबत दिलावर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहदी बिद्री तपास करीत आहेत.
दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास
कुऱ्हाड आणि कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी दिलावर शेख यांच्या घरातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, ४ हजार रुपयांच्या कानातील रिंगा, ४० हजार रुपयाची गळ्यातील चैन, २० हजाराचे झुमके, ३० हजाराच्या अंगठ्या, ४ हजाराचे पैंजण, १० हजाराची रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.