कराड प्रतिनिधी । शेतकरी संघटनेच्यावतीने कराड उत्तर तालुकाध्यक्ष वसिम इनामदार यांनी कराड येथील तहसिल कार्यालय समोर ऊसाला FRP अधिक 500 रूपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या 6 व्या दिवशी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “मंत्रालय म्हणजे एकमेकांची धुणी धुवायचा घाट झालेला आहे. याठिकाणी राज्यकर्ते एकमेकांची लक्तरे काढत असून त्यांच्याकडून कमरेखालील वार सुरू आहेत. महिला नेत्यांही एकमेकांची उणीधुणी काढत असून त्यांच्या या प्रकाराला आता मर्यादा राहिलेली नाही, असे राजकारण यापूर्वी महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही. राजकर्ते नालायक आणि टाकाऊ स्वरूपाचे झालेले आहेत,” अशी घणाघाती टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली.
कराड येथील शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी काल दिलेल्या भेटीप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नेते म्हणाले की, आजच्या राजकारणात नेते आणि महिला नेत्या या एकमेकांची धुणी धुवत आहेत, कोण- कोणत्या लाॅजवर गेल्या हे राज्यपातळीवरीले नेते काढत असतील. तर असल्या हरामखोरांकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या.
सध्याचे सरकार अनेक आश्वासने देत सत्तेत आलेले आहे. शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंन दिवस वाढत आहेत. तरीही सरकारचे डोळे उघडत नसतील, तर अजून प्रखर आंदोलन केले जाईल. तेव्हा सरकारला हे आंदोलन आवरणं अवघड होईल, असा इशारा यावेळी रघुनाथ दादा पाटील यांनी दिला.