कराड प्रतिनिधी | ज्येष्ठ चव्हाण नेते यांच्या यशवंतराव समाधीस्थळी अभिवादनासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी उपस्थिती लावली. यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. उसाला चार हजार रुपये दर द्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, अशा इशारावजा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करू, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. समीर देसाई, बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, जयवंत पाटील, नितीन शिंदे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सुनील सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रणजित पाटील उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांची दिवाळी चांगली गेली नाही. उसाचे मागील ऊसबिल व जाणाऱ्या उसाला पहिली उचल चार हजार रुपये व मागील ऊसबिल ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, ही आपणाला विनंती, तरी आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या उसाच्या दराचा प्रश्न मिटवावा, अन्यथा महाराष्ट्रात उग्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन दिले.
आता त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करू, अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.