सातारा प्रतिनिधी । एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे जानेवारी 2024 मध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला लाभार्थी यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
दरवर्षी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा सहलींचे आयोजन केले जाते. यावर्षी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा सहल काढली जाणार आहे. त्यामुळे परराज्यातील कृषि विद्यापीठे, राष्ट्रीय कृषि संशोधन संस्था, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या खासगी कंपन्या/संस्था, कृषि विभागाची विविध प्रक्षेत्रे, कृषि विज्ञान केंद्रे,
हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर व भारतीय कृषि संशोधन संस्था अंतर्गत संशोधन संस्था सारख्या संस्थांमध्ये जाऊन नव नवीन शोध, प्रगत तंत्रज्ञान, विविध पिक पद्धती, आधुनिक शेतीबाबतची माहिती घेता येणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या सहलीच्यासाठी दि. ५ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे.