शेतात तुटलेल्या वीज तारेच्या धक्क्याने शेतकरी महिला जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील गुठाळवाडी येथे तुटलेल्या विद्युत वाहक तारेने शेतकरी महिलेचा बळी घेतला आहे. शेतातील काम संपवून घरी निघालेल्या महिलेचा तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला.

पार्वती यशवंत महांगरे (वय 60, रा. गुठाळवाडी ता. खंडाळा) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पार्वती व त्यांचे पती हे शनिवारी सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी काम उरकल्याने दोघेही घरी परत येत होते. ते एका विहिरीजवळ आले असता पार्वती यांचा पाय तुटलेल्या विजेच्या तारेवर पडला. यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी पती यशवंत महांगरे यांनी प्रयत्न केला. यामध्ये त्यांनाही विजेचा धक्का लागल्याने ते बाजूला फेकले गेले.

यावेळी दोघांनीही आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेत झाडांच्या फांदीच्या साहाय्याने तुटलेली विजेची तार बाजूला केली. ग्रामस्थांनी पार्वती व यशवंत यांना शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पार्वती यांचा मृत्यू झाला. मृतदेहाचे विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यशवंत हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रणजित चांदगुडे, सहाय्यक अभियंता वैभव भोसले, प्रवीण महांगरे यांनी भेट दिली. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे.