सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील बावकलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी समीर जाधव यांनी 86032 उसाची रोप लागवड करून एकरी 106 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायद्याची ठरते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. याचा शेतकर्यांनी आदर्श घ्यावा. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी समीर जाधव यांच्या विक्रमी ऊस उत्पादनाची दखल घेत बांधावर जाऊन त्यांचे कौतुक केले.
समीर जाधव यांनी 4 फूट अंतरावर 1-7-23 रोजी लागवड केली होती. लागवडी नंतर 50 दिवसात 2 आळवणी व 3 फवारणी केल्या. त्यानंतर 50 दिवसांनी भरीचा डोस देऊन 90 दिवसांनी बांधणी केली. 180 दिवसांनी उसाच्या बुडक्यात कुदळीच्या साह्याने चारी घेऊन खताचा डोस दिला. त्यानंतर 3 महिन्यांनी ड्रीप मधून विद्रव्य खते दिली आहे, समीर जाधव यांनी ऊसाला 60टक्के रासायनिक व 40 टक्के सेंद्रिय खताचा वापर केला आहे. त्यांच्या उसाची उंची 55 कांडयाएवढी झालेली आहे. त्यांनी 49 गुंठे क्षेत्रात 129 टन 333 किलो एवढे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पुरूषोत्तम जगताप यांनी जाधव यांच्या शेतात जावून पाहणी केली.
यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी बापुराव गायकवाड, अँग्री ओरसेल प्रमोद होळकर, सोमेश्वरचे माजी संचालक विजय थोपटे, खंडाळा कारखान्याचे संचालक धनाजी अहिरेकर, जयवंत पवार, बहिरू जाधव, मंडल कृषी अधिकारी अनिल धुरगुडे, शुभम चव्हाण, माजी सरपंच हरिचंद्र माने, पिंपरे सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय भुजबळ उपस्थित होते. दरम्यान पिंपरे बुद्रक येथील शुभम चव्हाण यांनीही एकरी 100 टन उसाचे उत्पादन घेतले आहे.