सांगलीचे दिवंगत मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील उर्फ पापा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून वन विभागास 2 एकर जमीन दान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक दिवंगत अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या स्व:मालकीची पाटण तालुक्यातील पानेरी येथील असलेली दोन एकर जमीन वन विभागाच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या नावे करण्यात आली. कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात आज कुटुंबीयांनी 2 एकर जमीन बक्षीस पत्राद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या नावे करून दिली.

यावेळी दिवंगत अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा पाटील, कन्या सौ. रत्नप्रभा व सौ. गौरी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान कोल्हापूर वनपरिक्षेत्र अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, श्री. नाना खामकर यांची उपस्थिती होते.

दिवंगत अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील हे सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते. ते राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले असून राज्य वन्यजीवांच्या रक्षणासाठी त्यांनी सदैव उत्साहाने सहभाग नोंदवला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उभारणी व जडणघडण विकासासाठी संवर्धनाच्या कार्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मार्फत सुरू असणाऱ्या निसर्ग पर्यटन विकासामध्ये योगदान देण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. सदर इच्छेच्या अनुषंगाने त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, कन्या यांच्यासह सर्व कुटुंबियांनी विचार विनिमय करून कै. अजित श्रीधर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्व:मालकीची पानेरी तालुका पाटण येथील दोन एकर जमीन बक्षीस पत्राद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानला देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान कोल्हापूर तर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बक्षीस पत्रावर स्वाक्षरी केली. सदर जागेवर त्यांचे नावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कडून निसर्ग पर्यटन संकुल उभारण्याचे नियोजित आहे. दरम्यान, दिवंगत अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या कुटुंबियांनी केलेल्या सहकार्याबद्दल अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. कलेमेंट बेन तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. आर. एम. रामानुजन यांनी त्यांचे आभार मानले.

दिवंगत पापा पाटील यांच्याकडून आयुष्यातील 5 दशके पश्चिम महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी…

दिवंगत पापा पाटील यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास 5 दशके पश्चिम महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी वाहून घेतली होती. त्यांनी बत्तीस शिराला जिवंत नागपंचमीच्या प्रदर्शन बाबत जनहित याचिका दाखल केली होती आणि बत्तीस शिराला येथे बेकायदेशीर जिवंत सर्प प्रदर्शन थांबवले होते, तसेच त्यांनी चांदोली भागातील बेकायदेशीर बॉकसाईट खाणकाम विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. ते सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते. व महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत.