सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात १६ सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप काढले जाते. दरम्यान, यंदाच्या वर्षी या साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ५५ लाख ४ हजार ९८० टन ऊस गाळप करून ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे. सध्या सरासरी ९.७५ टक्के उतारा मिळत आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, यंदा पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई भासण्याच्या शक्यतेने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. जिल्ह्यात दहा सहकारी तर सहा खासगी कारखाने ऊस गाळप करीत आहेत. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी असून जिल्ह्याबाहेरील कारखान्यांकडून ऊस नेला जात आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उतारा खासगी कारखान्यांच्या तुलनेत जास्त आहे.
सहकारी कारखान्यांचा सरासरी १०.७१ टक्के तर खासगी कारखान्यांचा ८.४ टक्के साखर उतारा मिळत आहे.बहुतांश कारखान्यांनी ३००० ते ३१५० रुपये यांदरम्यान ऊस दर जाहीर केला आहे. सहकारी कारखान्यांनी २७ लाख ९४ हजार ५३४ टन गाळप करुन २९ लाख ९२ हजार ९१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांनी २७ लाख १० हजार ४४६ टन गाळप करुन २२ लाख ७६ हजार ३७५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे.