सातारा प्रतिनिधी । सातारा ते परळी रस्त्यावर इर्टिगा कारच्या शिक्षिका महिला चालकने भरधाव वेगात येवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश विकास चव्हाण (वय ३०), अश्विनी चव्हाण (वय २७, दोघे रा. अंबवडे खुर्द ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्याना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, परळी येथील मानेवाडीच्या शाळेतील शिक्षिका पुष्पा मोरे (वय ५०) शाळा सुटल्यावर आपल्या इर्टिगा गाडीतून भरधाव वेगाने सातारच्या दिशेने येत होत्या. यावेळी अविनाश चव्हाण व त्याच्या पत्नी अश्विनी त्यांच्या दुचाकीवरून अंबवडे खुर्द गावाला जात होते. शिक्षिका मोरे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यानी चव्हाण पती पत्नीच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दोघेही गाडीच्या टपावरून उडून बाजूला पडले. अश्विनी हिच्या डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध पडली.
तर अविनाश हा जखमी झाला. शिक्षिका मोरे ही किरकोळ जखमी झाल्या. हा अपघात पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी अश्विनी व अविनाशला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारास दाखल केले. दोन्ही गाड्याचे नुकसान झाले आहे. अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.