पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधारपाऊस कोसळत आहेत. आजही पावसाने तालुक्यात हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या निसरे येथील बंधाऱ्यात पुराच्या पाण्यातून वाहत आलेली मोठमोठी झाडे, झाडांच्या फांद्या, अडकल्या आहेत. बंधाऱ्यात अडकलेली लाकडे तत्काळ काढण्याची गरज आहे. अन्यथा बंधाऱ्याला धोका पोहोचण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त केलीय जात आहे.
चालू वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना नदीवरील अनेक बंधारे, छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता पाण्याखाली गेलेले बंधारे खुले होत आहेत. मात्र, पुरातून वाहत आलेली झाडे, मोठ्या फांद्या, प्लास्टिक बाटल्यांसह लाकडी साहित्य या बंधाऱ्यामध्ये अडकले आहे. पाणी कमी झाल्यानंतर बंधाऱ्यांना पाणी अडविण्यासाठी बसविण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा घालाव्या लागणार आहेत. त्याआधी या बंधाऱ्यामध्ये अडकलेली झाडे, झुडपे काढावी लागणार आहेत. तर काही ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम निखळले असल्याने त्याची डागडुजी देखील करावी लागणार आहे. तसेच येथील जुन्या फरशी पुलाला देखील झाडे, फांद्या अडकलेली आहेत.
मल्हारपेठ विभागातील शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी निसरे येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचा फायदा नदी काठावरील नावडी, मल्हारपेठ, नवारस्ता विभागातील शेती सिंचनासाठी होत असतो. विशेषतः उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे झाल्यास बंधाऱ्याच्या पाणी साठ्यामुळे पाणी टंचाई दूर होत असते. बंधाऱ्यामुळे झालेली जलक्रांती सर्व परिसराच्या फायद्याची ठरत असून बंधाऱ्याची देखभाल व दुरूस्ती ठेवणे गरजेचे आहे.