जादा परताव्याचे आमिष दाखवत अभियंत्याची 1 कोटीची केली फसवणूक

0
2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील एका कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवित अभियंत्याची १ कोटी १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर अभियंत्यास जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि.च्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध पुणे येथील सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मीकांत नथुराम त्रिवेदी (रा. फ्लॅट नंबर ३०१, भारत श्री एरंडवणे, पुणे) असे व्यवस्थापकीय संचालकांचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, आप्पासो दत्तात्रय शेडगे (वय ५६, मूळ रा. हातनूर ता. तासगाव जि. सांगली, सद्या रा. पुणे) हे एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये डिझायनर कन्सल्टंट म्हणून कार्यरत होते. शेडगे यांच्या एका मित्राने लक्ष्मीकांत त्रिवेदी यांची ओळख दिली. त्रिवेदी यांनी शेडगे यांना आपल्या धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि.या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करा, त्यावर तीस टक्के परतावा मिळवून देतो असे सांगितले. या आमिषाला बळी पडत आप्पासो शेडगे यांनी चेकद्वारे ८१ लाख व रोख स्वरूपात २९ लाख ५० हजार रुपये लक्ष्मीकांत त्रिवेदी याला दिले. याचा करारही करण्यात आला.

दरम्यान, गुंतवलेली रक्कम व परतावा न दिल्याने शेडगे याबाबत वारंवार विचारणा केली असता लक्ष्मीकांत त्रिवेदी यांनी टाळाटाळ केली. तसेच भेटायला गेले असता शेडगे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच शेडगे त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात लक्ष्मीकांत त्रिवेदी यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे अधिक तपास करीत आहेत.