पाटण विधानसभा मतदार संघात शंभूराज देसाई – सत्यजित पाटणकरांमध्ये होणार ‘काटे कि टक्कर’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई विजयी झाले होते. या मतदारसंघात दुरंगी लढत झाली होती. पाटणमध्ये शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीतसिंह पाटणकर अशी लढत झाली होती. शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 मतं मिळाली होती तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती. पाटणमध्ये पुन्हा एकदा दुरंगी लढत होणार असून देसाई पाटणकर यांच्यातच या मतदारसंघात अगदी काटे कि टक्कर अशी लढत होईल.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नसतानाच जयंत पाटलांनी सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघासाठी मंत्री शंभुराज देसाईंच्या विरोधात सत्यजित पाटणकरांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. तर सत्यजित पाटणकरांनीही शंभुराज देसाईंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना पराभूत करण्याचा चंगच बांधलाय. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे हर्षद कदम यांनीही पाटणवर दावा सांगितला आहे.

सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदार संघापैकी पाटण विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. शिवसेना नेते राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पाटण मतदारसंघाचे आमदार आहेत. पाटण विधानसभा मतदर संघातील लढत पारंपरिक विरोधकांमध्ये होते. पाटण तालुक्यातील राजकीय संघर्ष प्रामुख्यानं पाटणकर आणि देसाई यांच्यात राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत याही वेळेस देखील या दोन्ही घराण्यातील व्यक्ती पुन्हा एकदा आमने सामने दिसणार आहेत.

मुंबईतील निर्णायक मतदानावर लक्ष केंद्रित

पाटण विधानसभा मतदारसंघातील जवळपास ४० हजार मतदार मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असल्याने मतदारसंघांची रणधुमाळी पाटणपुरती मर्यादित न राहता मुंबईपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. पाटणकर आणि देसाई गटांचे मुंबईतील कार्यकर्ते कामाला लागले असताना उद्धवसेनाही यात उतरली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पक्षाने मुंबईतील निर्णायक मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे.

शिवसेना फुटीतील बंडाळी लोक अजूनही विसरलेले नाहीत

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावली होती. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जे बंड केले, त्या घडामोडींमध्ये पाटणचे आमदार शंभूराज देसाई आघाडीवर होते. सुरतला ते पहिल्यांदा पोहोचले होते. तसेच नाराज आमदारांशी चर्चा करण्यातही शंभूराजेंचा पुढाकार होता. शंभूराजे सध्या मुख्यमंत्र्यांच्या सर्वात निकटचे मानले जातात. मात्र, ज्यावेळी देसाईनी बंडाळी केली तेव्हा त्यांचा हा निर्णय न पटलेले पाटणमधील अनेक शिवसैनिक उद्धवसेनेतच राहिले. त्यांचे नेतृत्व हर्षद कदम करत आहेत.

…तर देसाईंना निवडणूक जड जाणार

पाटणचा विद्यमान आमदार पक्ष सोडून गेला तरी कदम यांनी उद्धवसेनेतून उमेदवारी मागितली आहे. त्यांनीही गेल्या अडीच वर्षांपासून पनवेल, ऐरोलीपासून ते मुलुंड, कुर्ला, दादरपर्यंत मुंबईल्या भागवाल्यांशी संपर्क ठेवला आहे. सत्यजीत पाटणकर आणि हर्षद कदम एकत्रित आल्यास पाटणमध्ये महायुतीला आव्हान नक्की देऊ शकतील यात शंका नाही.

देसाई तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात

२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनी राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकरांचा पराभव केला. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती सरकाच्या काळात मंत्रिपद असल्याने त्यांनी विकासनिधी मतदारसंघात आणला. यावेळेस तिसऱ्यांदा देसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहरेत. मात्र, त्यांच्यावर मध्यंतरी झालेल्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेमुळे ते चांगलेच चर्चेत आले.

2019 चं समीकरण कसं होतं?

१) शंभुराज देसाई – 1 लाख 6 हजार 266 मतं

२) सत्यजित पाटणकर – 92 हजार 91 मतं