सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दाणादाण उडवली आहे. त्यामुळे जावळी महाबळेश्वर वाई तालुक्यातील अनेक साखरपुल पाण्याखाली गेली असून ओढ्यांना देखील पूर आला आहे. धनावडे वस्ती (ता. वाई) येथील ३८ वर्षीय महिला किवरा ओढ्याच्या पुरात वाहून गेली आहे. शिल्पा प्रकाश धनावडे, असं महिलेचं नाव असून तिचा अद्याप शोध लागलेला नाही.
मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉईंट, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली,
वजराई-भांबवली धबधबा, कास तलाव तसेच जावली तालुक्यातील एकीव ही धबधब्याची ठिकाणे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचा आदेश दिला आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना दि.28 जुलै पर्यंत संबंधित ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.