कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असला तरी अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन आधीच झाले आहे. त्यानुसार पाटणचे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) कराड तालुक्यातील तांबवे येथे जाहीर सभा होणार आहे. कराड उत्तरमधील भाजपचे उमेदवार मनोज घोरपडेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची बुधवारी,( दि. ६ नोव्हेंबर) पाली येथे सभा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेबद्दल उलटसुलट चर्चा
पाटण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय, कॅबिनेट आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे महायुतीचे उमेदवार आहेत. मतदार संघात कोट्यवधीचा निधी आणल्याचा त्यांचा दावा आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांची सभा का घ्यावी लागली? ती सुध्दा पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ वगळून तांबवे गावातच का? अशी चर्चा पुनर्रचित सुपने जिल्हा परिषद मतदार संघात रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्त्याची डागडुजी
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तांबवे फाटा ते तांबवे आणि इतर मार्गाची डागडुजी युध्दपातळीवर सुरू झाली आहे. तांबवे गावच्या बाजारपेठेत भव्य मंडप उभारण्यात आलाय. सुपने जिल्हा परिषद मतदार संघातील तांबवे हे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. सुपने जिल्हा परिषद मतदार संघ पुनर्रचेत पाटणला जोडला गेला आहे. समोरचा प्रबळ उमेदवार हा पाटणमधील असताना मुख्यमंत्री यांची सभा तांबवे सारख्या गावात का घेतली? याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मनोज घोरपडेंच्या प्रचाराचा पालीत शुभारंभ
कराड उत्तरमधील महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन केले आहे. बुधवारी (दि. ६ नोव्हेंबर) रोजी खंडोबाच्या पाल नगरीत घोरपडेंच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. यानिमित्ताने सत्तेतील दोन दिग्गज सलग दोन दिवस कराड तालुका दौऱ्यावर असणार आहेत. मनोज घोरपडेंच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे कराड उत्तरचे लक्ष लागून आहे.