पाटण प्रतिनिधी | मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं; पण मराठा समाजाला वंचित ठेवले. आज मराठा समाजाला देण्याची वेळ आली, तेव्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. ती करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुख्यमंत्री दौलतनगर, ता. पाटण येथे आले होते. मराठा समाजासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला गेले अनेक वर्षे वंचित राहावं लागलं. आमच्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतली. आमच्या भूमिकेमुळे कोणत्याही समाजावर अन्याय झाला नाही.
सर्व समाज आमचेच आहेत. त्यामुळे एकाचे काढून दुसऱ्याला देण्याचे काम आमचे सरकार करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी भूमिका असताना अडथळे आणणे, तोंडाला पाने पुसली म्हणणे, सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हे टाळले पाहिजे. मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं; पण मराठा समाज वंचित ठेवला.”