सातारा प्रतिनिधी । आतापर्यंत आपण अज्ञात चोरटे असो किंवा दरोडेखोर यांनी तलवारीचा अथवा कुऱ्हाडीचा धक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याच्या घटना ऐकल्या असतील पण सातारा जिल्ह्यात बोरगाव पोलिस ठाणे हद्दीत एक अनोखी लूटमारीच्या घटना घडली आहे. ती म्हणजे चोरट्याने चक्क कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाक दाखवून दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अनोख्या ऊसाच्या दरोड्याची घटना ही घटना १२ डिसेंबर २०२३ रोजी घडली आहे. याची तक्रार दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार दि. ९ मार्च रोजी रात्री आठ वाजता बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली. बबन राजाराम पवार (वय ७२), महादेव राजाराम पवार( ७०), नंदा महादेव पवार (वय ६०), सुशांत मनोहर पवार (वय ३२), धोंडी धों राम राजाराम पवार (वय ६५), भरत महादेव पवार (वय २६), दत्तात्रय बबन पवार (वय ३५), सूरज शितोळे (वय २९, सर्व रा. आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वनिता मनोहर यादव (वय ५७, रा. आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) यांच्या शेतातील ऊस कामगारांमार्फत तोडून कारखान्यात नेला जात होता. १२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी अडीच वाजता वरील संशयितांनी हातात तलवार, कुऱ्हाड, लाकडी दांडके घेऊन ‘आडवा आला तर तुकडे करून टाकू,’ अशी ऊसतोड कामगारांना धमकी दिली. त्यानंतर तोडलेला ऊस ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये भरून जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत फिर्यादी वनिता यादव यांनी न्यायालयात फाैजदारी खटला दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार वरील संशयितांवर शनिवार, दि. ९ रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.